गुरुवार, १ सप्टेंबर, २०११

ये रे घना

ये रे घना

ये रे घना, ये रे घना
न्हाऊ घाल माझ्या राना

रानामधी पिकं माझी गेली बघ करपून
चाऱ्यासाठी गुरं ढोरं फिरती रे राना-वना
घरामधी पोरं सोरं उपाशी रे दाण्या विना ||१||

विटलो रे आम्ही सारे तुझी आस लावून
साल आता कटल कसं डोईवर कर्जाविना
थोरली पोर आता राहील रे लग्नाविना ||२||

कुठं रे तू बसला, दडी अशी मारून
मनामधी काळ्या सावल्या दिसतात फिरताना
म्हातारी गेली मरून, खावून रे कंद पाना ||३||

ये रे घना, ये रे घना
न्हावू घाल माझ्या मना

जून २००१...

आभाळाची मान

आभाळाची मान

जर तू उदास
भेदून तू हास
आभाळाची कमान
उंचावूनी मान ||१||

अंधाऱ्या कोनाड्यात
सैतानाची जात
बसते आहे हसून
दात असे विचकावून ||२||

दातांच्या फटीतून
अंधाऱ्या गुहेतून
फिरते शोध नजर
करीत पोकळ सफर ||३||

ह्या गुहेचा अंत
हे विश्व अनंत
सफर आपली गडे
पोकळीतून पोकळीकडे ||४||

जर तू उदास
भेदून तू हास
आभाळाची मान
उंचावूनी कमान ||५||

मार्च १९९८...